अफगण सरकारबरोबर चर्चेचा प्रस्ताव तालिबानने फेटाळला

काबुल – अफगाणिस्तान सरकारबरोबर थेट चर्चेचा प्रस्ताव तालिबानने फेटाळला आहे. पुढील दोन आठवड्यात थेट चर्चा केली जाईल, असे निवेदन अफगाणिस्तान सरकारच्या राज्यमंत्र्यांनी प्रसिद्धीस दिले होते. ते तालिबानच्यावतीने फेटाळण्यात आले. अफगाणिस्तान सरकारबरोबर कोणतीही थेट चर्चा होणार नाही. सर्व पक्षांबरोबर चर्चा होईल. त्यामध्ये सरकार सहभागी होईल, असे तालिबानचा प्रवक्‍ता झबिहुल्लाह मुजाहिद याने ट्‌विटरवर म्हटले आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच सरकारबरोबर थेट चर्चा केली जाईल, असेही या ट्विट संदेशात म्हटले आहे.

पुढील दोन आठवड्यात तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये थेट चर्चा होईल. ही चर्चा युरोपातील एखाद्या देशामध्ये होईल, असे शांतता राज्यमंत्री अब्दुल सलाम राहिमी यांनी म्हटले होते. या चर्चेसाठी शांतता मंत्रालयाने संबंधितांशी चर्चा आणि 15 सदस्यांचे शिष्टमंडळ तयार करण्यास सुरुवातही केली असल्याचे राहिमी यांनी म्हटले होते.

मात्र तालिबानबरोबर अमेरिकेने केलेला करार पूर्ण झाल्यानंतरच थेट सरकारबरोबरची चर्चा होईल, असे अमेरिकेचे विशेष दूत झालमाय खलिलझाद यांनी स्पष्टिकरण दिले आहेत. तालिबानने सातत्याने अफगाणिस्तानमधील अब्दुल गनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबर थेट चर्चेस नकार दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.