बंगळूर – केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी चक्क हवेत गोळीबार केल्याची घटना बुधवारी कर्नाटकमध्ये घडली. मात्र, त्या कृत्याबद्दल पोलिसांनी अटक केल्याने नेत्याचे अनोखे स्वागत चार समर्थकांना महागात पडले.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वी विस्तार झाला. त्यामध्ये भाजपचे नेते खुबा यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली.
इतर नव्या मंत्र्यांप्रमाणेच खुबा यांनी मोदी सरकारची कामगिरी जनतेपुढे मांडण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. त्यासाठी ते यादगीरमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री बनल्यानंतर खुबा प्रथमच शहरात येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी जंगी तयारी केली.
त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. त्या व्हिडीओमध्ये काही जण रायफलमधून हवेत गोळीबार करत असल्याचे दिसले. पोलिसांच्या उपस्थितीतच ते सगळे घडले.
मंत्रीमहोदयांच्या स्वागतावेळी घडलेल्या प्रकारावरून वादंग निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. संबंधित घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना खुबा यांनी समर्थकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. समर्थकांनी केवळ फटाके फोडले; गोळीबार केला नाही, असे त्यांनी म्हटले.