आंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली एक लाखाची लाच

मंचर/डिंभे – कुरवंडी येथील डबर वाहतूक करणाऱ्याकडून 1 लाख रूपयांची लाच घेताना आंबेगाव तालुक्‍याच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व लिपीक दिनकर लाडके यांना घोडेगाव येथे रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांनी दिली.

घोडेगाव येथे तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कारवाई करून डबर वाहतूक करणारी ट्रक आणून ठेवली होती. तहसीलदार पैकेकरी यांनी ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रूपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदाराने सांगितले. त्यानंतर झालेल्या तडजोडीनुसार 46 हजार रूपये दंड व 1 लाख रूपये लाच देण्याचे ठरले.

तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सायंकाळी सहा वाजता तहसील कार्यालयामध्ये 1 लाख रूपयांची रोख लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, सीमा मेहंदळे, हवालदार रशिद खान, दीपक टिळेकर, अभिजीत राऊत यांनी कारवाईत भाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.