पुणे विद्यापीठाच्या सर्व शाखांचे अभ्यासक्रम यंदा बदलणार

रोजगारक्षमतेवर भर : पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांसाठी निर्णय

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा यावर्षी शैक्षणिक वर्षापासून पदवी व पदव्युत्तर विभागातील सर्व शाखांचे अभ्यासक्रम बदलणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जून महिन्यात पदव्युत्तर विभागातील प्रथम वर्षाचे अभ्यासक्रमात बदल होणार असून, त्यात इंडस्ट्रीचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी मिळणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.

अभ्यासक्रम बदलण्याचे काम जवळपास 80 टक्‍के पूर्ण झाले आहे. यासंदर्भात विद्यापीठाने सर्व अधिष्ठातांची बैठक, कार्यशाळा, चर्चासत्र, अभ्यास मंडळाच्या बैठका घेऊन अभ्यासक्रम पूर्णत्वास येत आहे. सर्वप्रथम प्रथम वर्षाचा बदलण्यात येईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. या अभ्यासक्रम बदलामुळे विद्यार्थ्यांना जगात घडणाऱ्या आधुनिक गोष्टींची माहिती पाठ्यपुस्तकातून मिळणार आहे. तसेच बाजारपेठ आणि औद्योगिक क्षेत्रातील चालू घडामोडींशी जुळवून घेण्याची संधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करण्याच्या वेळावेळी सूचना दिल्या आहेत. मात्र त्यानुसार अभ्यासक्रमात काळानुसार बदल केले जात नाही. त्याचाच परिणाम विद्यार्थी हा इंट्रस्टीमध्ये तग धरू शकत नाही. त्यामुळे पदवी घेऊनही विद्यार्थी बेरोजगार राहत असल्याचे वास्तव आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केवळ पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यापेक्षा, या काळात विद्यार्थ्यांनी कौशल्याच्या दृष्टीने काय आत्मसात केले, याचा विचार नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रोजगाराच्या दृष्टीने सक्षम विद्यार्थी घडावेत, असा उद्देश नवीन अभ्यासक्रमाचा आहे.

देशाच्या विकासासाठी मानवी भांडवल उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थी सक्षम होण्याच्या दृष्टीने नवीन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ शिक्षणापेक्षा त्यातून करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना काय उपयुक्‍त ठरणार आहे, याचा प्रामुख्याने नव्या अभ्यासक्रमा अंतर्भाव करण्यात आला असून, ते भविष्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार पदवी अभ्यासक्रमांमध्ये “चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आकलन, ज्ञान, कौशल्य व त्याचा वापर कसा करायचा, हे गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, त्यादृष्टीने विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखेतून आवडीचे आणि ऐच्छिक शिक्षण घेण्याची संधी मिळण या शिक्षणाचे क्रेडिट पॉइंट्‌स विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.