सणासुदीत गुळाचा गोडवा महागला

नीरा बाजार समितीत गुळाला चार हजारापर्यंत भाव

महापुराचा परिणाम

पश्‍चिम महाराष्ट्र नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीकाठी असलेला ऊस पाण्याखाली गेल्यामुळे साखर कारखानदारीबरोबर गुऱ्हाळघरांची अवस्था बिकट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून गुळाची बाजारपेठ देशभरात आहे. येथील गुळाला देशभरातून मागणी असल्यामुळे जिल्ह्यात गुऱ्हाळघरांची संख्या लक्षणीय आहे. त्याचा परिणाम गूळ दरावर होणार असल्याचे दिसत आहे.

नीरा – हिंदू धर्मातील सणासुदीचा श्रावण महिना आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव या पार्श्‍वभूमीवर गुळाची मागणी वाढली असून नीरा मार्केट कमिटीमध्ये आज झालेल्या लिलावात गुळाला चार हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला.

साधारणतः आषाढ महिन्यानंतर हिंदू धर्मातील अनेक सण साजरे केले जातात. या काळात गोड-धोड पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे गुळाला मागणी वाढते. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेल्या गुळाच्या लिलावामध्ये गुळाला गेल्या महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच पाचशे ते सहाशे रुपये जास्तीचा भाव मिळाला. पुढील काळात येणारे विविध सण, गणेशोत्सव यामुळे गुळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नीरा व परिसरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळे आहेत. त्यामुळे या भागातील गूळ नीरा मार्केट कमिटीमध्ये विक्रीसाठी येत असतो.

महाराष्ट्रातील कोल्हापूरनंतर नीरा येथील गूळ मार्केट मोठे मार्केट आहे. या दोन मार्केटवरतीच राज्यातील गुळाचा बाजार ठरत असतो. नीरा मार्केटमध्ये आज झालेल्या लिलावात गुळाला चांगला भाव मिळाला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गुळाचा भाव वधारल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. आज मार्केटमध्ये केडगाव, साखरवाडी, मुरुम या भागातून गुळ विक्रीस आला होता.

बाजारातील गुळाची किंमत मागणी व पुरवठ्याच्या होणाऱ्या तफावतीमुळे कमी-जास्त होते. सध्या गुऱ्हाळे बंद आहेत. त्यामुळे पुरवठा कमी आहे. तर सणासुदीच्या दिवसामुळे गुळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे गुळाचे भाव वाढले आहेत. पुढील काही काळ गुळाचे भाव हे चढेच असतील.

– शांतीकुमार कोठडीया, गूळ व्यापारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)