राज्यात “माळेगाव’कडून 3 हजार 400 रुपये उच्चांकी दर
बारामती – बारामती तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये दरवाढीची चढाओढ लागली असून ऊस उत्पादकांसाठी ही “गोड’बाब ठरणारी आहे. काही दिवसांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 3 हजार 300 रुपये राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना ठरला होता. तर या उच्चांकी दराचा विक्रम बुधवारी (दि. 4) माळेगाव कारखान्याने मोडून 3 हजार 400 रुपये जाहीर केल्याने तालुक्यातील कारखान्यांमध्ये “गोड’ युद्ध रंगल्याची चर्चा ऊस उत्पादकांमध्ये रंगली आहे.
दर ऊस उत्पादक सभासदांना जाहीर करून राज्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. 11.76 साखर उताऱ्याला प्रतिटन 3 हजार चारशे रुपये दर देणारा माळेगाव कारखाना राज्यात एकमेव असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे व ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रति टन 3400 रुपये दर जाहीर केला. खोडव्यासाठी 150 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. खोडव्याला 3550 रुपये मिळणार आहेत. तसेच 10001 व 8005 जाती उसाला 100 रुपयांचे अनुदान येणार आहे. म्हणजे 10001,8005 उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळणार आहे. माळेगावने आपल्या उच्चांकी दाराची परंपरा राखत महाराष्ट्रमध्ये दराचा इतिहास रचला असल्याचे तावरे यांनी स्पष्ट केले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना 31 लाख 51 हजारांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. पूरग्रस्तांना अशा प्रकारची मदत करणारा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात एकमेव असल्याचे त्यांनी नमूद केले.
85 कोटी 75 लाखांची देणी दिली
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 178 कोटी 42 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक केले आहे. त्यासाठी 85 कोटी कर्ज नव्याने घेतले आहे. 93 कोटी स्व भांडवलातून खर्च केले आहेत तसेच शासकीय भांडवल व जुनी कर्जे असे 85 कोटी 75 लाखांची देणी गेल्या साडेचार वर्षांत दिली आहेत.