भोपाळ: मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल अशी भविष्यवाणी केल्याबद्दल संस्कृत विषयाचे प्राध्यापक राजेश्वर शास्त्री मुसळगावकर यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुसळगावकर यांनी एनडीएला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली होती.
मुसळगावकर हे विक्रम विद्यापीठामध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी केलेली भविष्यवाणी ही आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने केली होती. मुसळगावकरांची भविष्यवाणी मतदारांना प्रभावित करेल असा या कार्यकर्त्याचा दावा होता. या तक्रारीच्या आधारे मुसळगावकरांना निलंबित करण्यात आले. या निलंबनाला मुसळगावकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती विवेक रुसिया यांनी निलंबनाला स्थगिती देतानाच उच्च शिक्षण विभाग, विक्रम विद्यापीठाचे रजिस्ट्रार, मध्य प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस धाडली आहे.