महिलेशी शादी डॉट कॉमवरून झाली होती संशयिताची ओळख
पुणे – शादी डॉट कॉमवरून झालेल्या ओळखीतून एका महिलेच्या नावाने कर्ज घेण्यात आले. त्यानंतर कर्जाच्या रकमेतून स्पोर्ट कार घेऊन पलायन करण्यात आले. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीसह चौघांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेची आरोपीबरोबर शादी डॉट कॉम वेबसाइटवर ओळख झाली होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात अडकवले होते. याप्रकरणी वानवडीतील नेताजीनगर येथे राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 पासून आजवर घडली. राहुल ऊर्फ अजित वायकर (रा. पिंपरी-चिंचवड) आणिइतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने ऑक्टोबर 2018 मध्ये शादी डॉटकॉमवर खाते उघडले होते. यावेळी एका व्यक्तीने त्याचा विवाह झाला असतानाही खोटे नाव सांगून ओळख वाढवली. त्यानंतर वेळोवेळी फोन आणि मेसेज पाठवून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीच्या नावाने 6 लाख 91, 556 रुपयांचे कर्ज औंध येथील एका बॅंकेतून घेतले. त्यानंतर एका नामांकित कंपनीची स्पोर्ट कार घेऊन संबंधित व्यक्ती फोन बंद ठेवून कोठेतरी निघून गेला. त्याला त्याच्या कुटुंबातील एक महिला आणि पुरुषांनीही साथ दिली असल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोटवडे करत आहेत.