मंचर – मंचर येथे शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकाच दिवशी 1111 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 176 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच उर्वरित तालुक्यातील 33 करोनाबाधित रूग्ण आढळले. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात एकाच दिवसात करोनाबाधितांनी द्विशतक (209) पार केले आहे.
मंचर अवसरी फाटा येथे गेल्या आठवड्यात मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मंचर शहरात घरोघरी जाऊन महासर्वे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंचर शहरात आरोग्य विभागाने मोठा महा सर्वे घेतला. त्यानुसार शहरात सहा हजार कुटुंबाची तपासणी करून 1111 संशयित रुग्ण सापडले असून त्यापैकी 176 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानुसार शहरात सहा हजार कुटुंबाची तपासणी करून 1111 संशयित रुग्ण सापडले असून त्यापैकी 176 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. आजपर्यंत मंचर शहरात एकूण रुग्णसंख्या 714 झाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांच्या निर्देशानुसार मंचर शहरात बुधवारी 111 पथकांनी प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले. संशयित रुग्णांची रॅपिड अँटिजेन टेस्ट एकूण 6 ठिकाणी होणार आहे, त्यासाठी 11 पर्यवेक्षक, 6 टेस्टिंग टीम, 30 टेस्टिंग स्टाफ, 12 पोलिस, 3 ऍम्ब्युलन्स, अतिरिक्त 20 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, 25 स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली.
यासाठी खासगी लॅबचे सहकार्य लाभले. सर्वेक्षण मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य केल्याचे प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर यांनी सांगितले. तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, मंचर ग्रामपंचायतीचे प्रशासक जयराम लहामटे, ग्राम विकास अधिकारी सचिन उंडे आणि मंचर शहरातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महासर्वेला मदत केली.