1 जुलै पासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू होणार

राफेल, अयोध्या सारख्या महत्वाच्या विषयांवर पुन्हा सुरू होणार सुनावणी

नवी दिल्ली – सुमारे सहा आठवड्यांच्या पारंपरीक उन्हाळी सुटीनंतर येत्या 1 जुलै पासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज नियमीतपणे सुरू होत असून काही संवेदनशील विषयांवरील सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. यात प्रामुख्याने राफेल घोटाळा प्रकरणातील फेरआढावा याचिका, राफेल प्रकरणातच राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेली याचिका, आणि अयोध्या प्रकरणातील सुनावणीचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशांची सर्व मंजूर 31 पदे भरली गेली आहेत. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून राफेल प्रकरणातील फेरआढावा याचिकेवर निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2018 रोजी राफेल प्रकरणात दाखल केलेल्या सर्व याचिक फेटाळून लावल्या होत्या. तथापी राफेल प्रकरणातील काही तथ्ये नव्याने समोर आल्यानंतर या निकालाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका यशवंत सिन्हा आणि अरूण शौरी अदिंनी केली होती. त्यावर हा निकाल महत्वपुर्ण ठरणार आहे कारण या विषयाला राजकीय महत्व आहे. राहुल गांधी यांनी चौकीदार चोर हेै असे न्यायालयानेही मान्य केल्याचे जे विधान केले होते त्यावर मीनाक्षी लेखी यांनीही एक अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावरही न्यायालयाकडून पुन्हा सुनावणी सुरू केली जाणार आहे. अर्थात या विषयावर राहुल गांधी यांनी या आधीच माफी मागितली आहे.

अयोध्या प्रकरणात मध्यस्थी नेमण्यात आलेल्या तीन जणांच्या समितीच्या कार्यवाहीबाबतही न्यायालयाकडून काय निर्णय होतो आहे याविषयी उत्सुकता आहे. या समितीला तोडगा काढण्यासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण चौदा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांचे भवितव्यही बऱ्याच प्रमाणात मध्यस्थांच्या अहवालावर अवलंबून आहे. या खेरीजही अन्य महत्वाच्या विषयांवर सुनावणी होंणार आहे. यात काश्‍मीरविषयक कलम 35 ए दिलेल्या आव्हान याचिकेचही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.