निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली – निवडणूक प्रचारात जाती-धर्माच्या आधारे मते मागणाऱ्या नेत्यांवर कारवाई न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. “धर्माच्या आधारे मतदान करा’, या वक्तव्यावरील नोटिशीला मायावतींनी उत्तर दिले नाही, मग तुम्ही काय केले? असा प्रश्‍न उपस्थित करत न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. तसेच या प्रकरणी मंगळवारी होणाऱ्या सुनावणीला निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनीही हजर राहण्याचे आदेशही दिले.
निवडणूक प्रचारादरम्यान धर्म आणि जातीच्या आधारे मते मागणाऱ्या नेत्यांवर आणि पक्षांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने सुनावणी करताना निवडणूक आयोगाला फटकारले. धर्माच्या आधारे मते देण्याचे आवाहन केल्याने बजावलेल्या नोटिशीला मायावतींनी उत्तरही दिले नाही. तुम्ही काय केले? असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर आमचे अधिकार मर्यादित आहेत, असे उत्तर आयोगाने दिले. त्यावर या प्रकरणी न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.