नवी दिल्ली – दागिन्यांच्या सुरक्षेसाठी सुनेकडून तिचे दागिने काढून घेणे हा सुनेचा केलेला छळ ठरत नाही असा निर्वाळा एका प्रकरणात सुप्रिम कोर्टाने दिला आहे. आयपीसीच्या कलम 498 अ अन्वये संबंधीतांवर या प्रकरणात खटला दाखल करता येणार नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.
सदर महिलेने आपल्या सासरच्या लोकांच्या विरोधात 498 अ अन्वये छळाचा गुन्हा दाखल केला होता. आपला दीर आणि सासरचे लोक आपला छळ करतात आणि आपले दागिनेही त्यांनी काढून घेतले आहेत अशी तिची तक्रार होती. त्या तक्रारीवरून पंजाब व हरियाना हायकोर्टाने तिच्या दिराला अमेरिकेत नोकरी करण्यासाठीही जाऊ देण्यास अनुमती नाकारली होती. पण सुप्रिम कोर्टाने हा निकाल रद्दबातल करून सासरकडच्या लोकांना दिलासा दिला. सासर कडच्या लोकांनी सुनेला दिराशी जुळवून घे आणि पुढील भांडणे टाळ अशी सुचना करणे हाही गुन्हा ठरू शकत नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून सासरकडच्या लोकांनी या प्रकरणात तिच्याकडील दागिने काढून घेतले होते, पण या संबंधात तिने केलेली तक्रार मोघम आहे आणि सुरक्षेसाठी दागिने काढून घेणे हा 498 अ अन्वये गुन्हा ठरवता येणार नाही असेही कोर्टाने नमूद करीत तिच्या सासरकडच्या लोकांना दिलासा दिला आहे. आणि तिच्या दिराला अमेरिकत नोकरीसाठी जाण्यास अनुमती दिली आहे.