पुणे – बाजारवाडी (ता. भोर) येथील शिवारात राष्ट्रीय पक्षी असलेल्या दोन मोरांचा अकस्मित मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले असून, येथील शेतकऱ्याने भोर वनविभागास कळवून मृत मोरांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे बाजारवाडीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
वनविभागाने त्याचे नमुने पुण्यातील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पूर्व तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती यांनी दिली.
भोर वनविभागाच्या डोंगरांना वणवा लागत असल्यामुळे वनातील पक्षी, प्राणी हे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वास्तव करत असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि. 28) बाजारवाडीच्या शिवारात शेतकरी तानाजी शिंदे हे शेतीला पाणी देण्यासाठी शेतात असलेली विद्युत मोटर चालू करण्यासाठी जात असताना ओढ्याच्या शेजारील शेतात एका मोराचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पाहिले, तर दुसरा मोर मृत्यूशी झुंज देत गवताच्या जाळ्यात तडफडत होता. हे पाहताच त्यांनी वन संरक्षक पांडुरंग गुठ्ठे, वन कर्मचारी आकाश चव्हाण , धैर्यशील चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी तडफडत असलेल्या मोरास पाणीही पाजले; पण अखेर त्याचा मृत्यू झाला.
वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांच्या मार्गदशनाखाली मृत मोरांना भोर येथील पशू चिकित्सालयात तपासणीसाठी येण्यात आले. त्याचा विषारी वनस्पतीमुळे बाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचे नमुने पूर्व तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत, तसेच भाटघर येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात या मोरांना अग्नी देण्यात आला.