बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात विरोधकांना यश

फलटण
फलटणचेही योगदान, आता चर्चा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या डावपेचांची
फलटण – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या माढा मतदारसंघात भाजपने संधी दिलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर या युवा नेतृत्त्वाला पंतप्रधान मोदींच्या करिष्म्याने विजय मिळवून दिला. फलटण विधानसभा मतदारसंघानेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मताधिक्‍य वाढविण्यात मोठे योगदान दिले. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी फलटणमधील राष्ट्रवादीच्या एकतर्फी वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजप काय डावपेच लढविणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणावर पकड निर्माण करीत साताऱ्याचा बालेकिल्ला अधिक मजबूत केला. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाने या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात विरोधक यशस्वी झाले असून रणजितसिंह यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरश: वर्षाव होत आहे. या मतदारसंघात 31 उमेदवार रिंगणात होते. मात्र राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मुख्य सामना झाला.

बलाढ्य राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी भाजप पर्याय शोधू लागला. दरम्यान, दूध व साखर व्यवसायातील एक अभ्यासू, युवा नेते रणजितसिंह कॉंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असतानाच माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सर्वच प्रमुख पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी केवळ आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करावयाची आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र हा आघाडी धर्म पाळला जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य न करण्याची चर्चा गतीमान झाली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. नंतर माघारही झाली.

मोहिते पाटील कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, रणजितसिंह नाइक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली. संजयमामा शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आमने सामने आले. रणांगणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या. त्यातच मुख्यमंत्री, महसूल मंत्री व अनेक मंत्र्यांसह खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही प्रचारात सहभागी होऊन वातावरण रणजितसिंहांच्या बाजूने वळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मोठी जाहीर सभा अकलूज येथे झाल्यानंतर रणजितसिंहांचा विजय निश्‍चित मानला जात होता.

या पार्श्‍वभूमीवर शरद पवार, अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत संजयमामा शिंदे यांच्यामागे मोठी शक्ती उभी केली. संजय मामांचे बंधू आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांनीही संजयमामांना विजयी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. तरीही भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या आकर्षणाच्या पार्श्‍वभूमीवर या मतदारसंघातही मतदारांनी आपला कौल रणतजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने दिल्याने त्यांचा विजय निश्‍चित झाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×