उत्तम समन्वयामुळेच हॉकी संघाला यश

अव्वल खेळाडू एस. व्ही. सुनीलचे मत

नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघात गेल्या कित्येक वर्षांनंतर उत्तम समन्वय अस्तित्वात आल्यामुळेच गेल्या दोन वर्षांत सातत्याने यश मिळत आहे, असे मत भारताच्या हॉकी संघाचा अव्वल खेळाडू एस. व्ही. सुनील याने व्यक्‍त केले आहे. 

भारतीय हॉकी संघ सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी होत आहे. काही वेळा स्पर्धांमध्ये अपयश आले असले तरीही खेळाडूंना जो अनुभव मिळाला आहे. त्याचा लाभ पुढील मोसमात होत असलेल्या स्पर्धांसाठी निश्‍चितच होणार आहे. करोनामुळे जवळपास सहा महिने हॉकी ठप्प आहे. मात्र, आता माझ्यासह काही सहकारी खेळाडूंना सरावाची संधी मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात स्पर्धाही सुरू होतील, असा विश्‍वासही त्याने व्यक्‍त केला.

गेल्या वर्षीपासून प्रशिक्षक, कर्णधार व खेळाडू तसेच फिजिकल ट्रेनर सातत्याने एकमेकांशी संवाद साधत आहेत. आता संघात उत्तम समन्वय निर्माण होत आहे. हीच यशाची पहिली पायरी आहे. जर सर्वांमध्ये उत्तम संवाद व समन्वय असेल तरच यश मिळते. संघाच्या खेळाडूंचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्यात जिंकण्याची जिद्द निर्माण होणे अत्यंत आवश्‍यक होते व तेच आता घडत आहे. मी गेली तेरा वर्षे भारताकडून खेळत आहे; परंतु आता जो संघ आहे तो अत्यंत वेगळा भासतो, खेळाडूंमध्ये आत्मविश्‍वास प्रचंड वाढला आहे. याची साक्ष येत्या काळात अनेक स्पर्धांमध्ये पटेल, असेही त्याने सांगितले.

ऑलिम्पिककडे लक्ष 

जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेला अद्याप बराच कालावधी असल्याने खेळाडूंना सरावही चांगला मिळणार आहे. तसेच काही देशांत करोनाचा धोका खूपच कमी झाल्याने होत असलेल्या काही स्पर्धांद्वारे ऑलिम्पिकची तयारी करता येणार आहे, असेही त्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.