पुणे – भाजप सरकारच्या काळात बंद झोलेले दूध भूकटी आणि दूध निर्यातीचे अनुदान आता पुन्हा सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच राज्य शासनाने काढला आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांना अनुदान देण्यात येत होते; पण 2014 मध्ये भाजप सरकार राज्यात स्थापन झाल्यावर दूध भूकटीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड घसरले. त्यामुळे भाजप सरकारने अुनदान देणे बंद केले होते. त्यानंतर काही दिवसांत भूकटीचे दर पुन्हा वाढले तरी हे अनुदान सुरू झाले नव्हते. याबाबत दूध प्रक्रिया उत्पादक कल्याणकारी संस्थेच्यावतीने निवेदनही दिले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नव्हती.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यावर नागपूर अधिवेशनात दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली होती. दरम्यान, दूध भूकटीसाठी प्रति किलो 50 रुपये तर, दूध निर्यातीसाठी प्रति लिटर 5 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.