अहमदाबाद – कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टी जास्त त्रासदायक नसते हा समज या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीने खोटचा ठरवला. मात्र, त्यातही नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज अक्सर पटेलने एक वेगळाच फॉर्म्युला तयार केला होता व त्यानूसारच गोलंदाजी केली व यशस्वी झाला. या फॉर्म्युलाची माहिती समालोचकांच्या माध्यमातून बाहेर आली.
चेन्नईच्या कसोटीत अक्सर यशस्वी ठरला होता. मात्र, यावेळी त्याची गोलंदाजी खेळणें इंग्लंडसाठी कर्मकठीण बनले याचे कारण त्याने केवळ स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी केली. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला रुम न देण्याची त्याची व्यूहरचना यशस्वी ठरली. त्याने इंग्लंडचे सहा फलंदाज बाद करताना संपूर्ण वर्चस्व राखले.
अक्सरने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना पायचित केले तर दोन फलंदाजंचा त्रिफळा उडवला. लाईन ऑफ स्टम्प गोलंदाजी केल्यामुळेच हे यश मिळाले, असे मत समालोचन कक्षातून विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनीही व्यक्त केले.
अक्सरने दुसऱ्या डावातही 5 गडी बाद करत आपला फॉर्म्युला पुन्हा एकदा यशस्वी असल्याचे सिद्ध केले. त्याने आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसराच कसोटी सामना खेळताना आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला एक चांगला डावखुरा फिरकी गोलंदाज गवसला आहे.