बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “प्रभात ग्रीन गणेशा 2019′ कार्यशाळा
पुणे – आसनावर विराजमान झालेला “बाप्पा’… सिंहासनावर आसनस्थ झालेले “गणराय’ अशी गणपतीची विविध रूपे अनेकांनी साकारली. कोणी “बाप्पा’हातात लाडवांची वाटी तर कोणी थेट मोबाइलच दिला. आपली कौशल्ये वापरून विद्यार्थ्यांनी “कलात्मक गणराया’चे दर्शन घडविले. निमित्त होते, “प्रभात ग्रीन गणेशा 2019’चे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी दै. “प्रभात’ने यंदा “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. 30 ऑगस्टपर्यंत घेण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी मनावर अधिराज्य करणाऱ्या “बाप्पा’ला मूर्त स्वरूप दिले.
या उपाक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दहापेक्षा अधिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी सिद्धीविनायक ग्रुप, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पुणे महापालिका यांचे सहकार्य लाभले आहे. शिल्पकार नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना शाडूची मूर्ती बनवण्याचे तंत्र शिकवत आहेत. बुधवारी “प्रभात ग्रीन गणेशा 2019′ ही कार्यशाळा “बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल’ येथे झाली.
“प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मातीतून गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद घेतला. या शाळेतील सुमारे 350 विद्यार्थ्यांनी मूर्ती साकारली. यावेळी जाहिरात विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर यांचे मानपत्र देऊन गौरव केला. शाडू मातीच्या मूर्तीमुळे प्रदूषण कमी होण्याला हातभार लागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी दै. “प्रभात’शी बोलताना नमूद केले. तर विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयात त्यांना मूर्तीकलेचे प्रशिक्षण मिळत असल्याने शिक्षकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
पहिल्यांदा अवघड वाटले, नंतर आम्ही करू शकलो…
स्वत: मूर्ती साकारण्याचा अनुभव आम्ही “प्रभात ग्रीन गणेशा 2019′ या कार्यशाळेच्या माध्यमातून घेऊ शकलो. पहिल्यांदा मूर्ती साकारताना अवघड वाटले. पण मूर्तीकारांच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीत आम्ही मूर्ती तयार करू शकलो. खूप सुंदर अनुभव होता. यापुढे आम्ही दरवर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीची मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करणार आहोत, असे विद्यार्थी दै. “प्रभात’शी बोलताना म्हणाले.
हातात मोबाइल आणि चष्मा असणारा बाप्पा
सध्याचे युग “टेक्नोसॅव्ही’ असल्याने सर्वांच्या हातामध्ये सातत्याने मोबाइल दिसत आहे. त्यामुळे एकमेकांशी होणारा संवाद विसरत चालला आहे. त्याचबरोबर वारंवार मोबाइलचा वापर केल्याने सर्वांना चष्मे देखील लागत आहेत. ही परिस्थिती दाखवण्यासाठी मी “बाप्पा’च्या हातात मोबाइल आणि चष्मा दाखवला आहे, अशी भावना या शाळेतील विद्यार्थ्याने व्यक्त केली.
शाडूच्या मातीची मूर्ती साकारण्याच्या या कार्यशाळेचे आयोजन केल्याबाबत दै. “प्रभात’चे आभार. आमची शाळा पर्यावरणीय उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या कार्यशाळेची देखील त्यामध्ये भर पडली आहे. या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी पुढील काही दिवसांमध्ये शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. इतकेच नव्हे तर साकारलेल्या या पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना विद्यार्थी यंदा करणार आहेत.
– गीतांजली बोधनकर, मुख्याध्यापिका, बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल