वॉशिंग्टन – अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे महात्मा गांधी पार्क येथे खलिस्तानी समर्थकांचा एक छोटा गट आणि गांधी समर्थकांमध्ये चांगलाच संघर्ष उडाला. त्यावेळी तेथे पोलिसांना पाचारण करावे लागले. या पार्कमधील गांधींच्या पुतळ्याची काही जणांनी मोडतोड केल्याची बाब निदर्शनाला आल्यामुळे त्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी व समर्थनासाठी काही गांधी प्रेमी नागरीकांनी तेथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी खलिस्तानी समर्थकांनी तेथे जमून तेथे हा पुतळा पुन्हा बसवण्यास विरोध केला.
या पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गांधींच्या समर्थकांच्या सभेत डेव्हिस शहराच्या महापौर ग्लोरिया पार्टिका उपस्थित होत्या. त्यांनी पुतळ्याची जी मोडतोड झाली त्याचा निषेध केला. गांधी हे आमचे प्रेरणास्थान आहे आणि असे प्रकार आम्ही येथे होऊ देणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
सारर्क्रमेंटो येथील भारतीय नागरीकांच्या संघटनेने ही सभा आयोजित केली होती. या पुतळा समितीचे व शांतता समितीचे सदस्य शाम गोयल यावेळी बोलताना म्हणाले की, पुतळ्याची मोडतोड करण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या खलिस्तान समर्थक गटाने घोषणाबाजी करून सभेत अडथळे आणले त्यावेळी हा संघर्ष उडला. हा गट भारतीय अल्पसंख्याकांची संघटना म्हणून तेथे उपथित होता.
या संघटनेचे नानक भट्टी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची येथे गरज नाही. त्यामुळे तेथे हा पुतळा पुन्हा उभा करण्यास आमचा विरोध आहे. त्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी सभेतील वक्त्यांना बोलू दिले नाहीं व त्यांनी या सभेत अडथळे आणले. त्यामुळे तेथे पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.