पिंपरी (प्रतिनिधी) – प्रशासनाकडून दिला जाणारा मानसिक त्रास आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या स्टाफ नर्स कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि.8) पाचव्या दिवशीदेखील रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले आहे. यामध्ये 92 स्टाफ नर्स सहभागी झाल्याची माहिती या नर्सनी दिली.
प्रशासनाकडून रुग्णसेविका, रुग्णसेवकांवर मोठा अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात काम करताना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता, आयसीयू भत्ता व वेतनवाढ यांसारख्या आथिरक बाबीकडे रुग्णालय प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. करोनाच्या काळातही या नर्सला आंदोलन करावे लागत आहे.
आंदोलन करत असलेल्या परिचारिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्टाफनर्सला कामकाजापेक्षा अधिक वेळ काम करावे लागत असल्याने ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल, अशी रुग्णालय प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, आमच्या मागण्या सनदशीरपणे मांडण्यावर ठाम असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. गेल्या पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे, परंतु व्यवस्थापन आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही.