अंबाला (चंदीगड) : भारतीय हवाई दलासाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे कारण. बहुप्रतीक्षित फ्रान्समधून आलेली पाच राफेल लढाऊ विमाने आज औपचारिकरित्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाली. अंबाला एअर बेसवर झालेल्या या कार्यक्रमात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली या देखील उपस्थित होत्या.
#WATCH Live: Defence Minister Rajnath Singh and French Defence Minister brief the media in Ambala https://t.co/EBbwgMvywq
— ANI (@ANI) September 10, 2020
राफेल लढाऊ विमानांची भारतीय वायुदलातील एन्ट्री संपूर्ण प्रक्रियेसोबत झाली. सर्वात आधी सर्वधर्म पूजा करण्यात आली, त्यानंतर विमानांची प्रात्यक्षिकं करण्यात आली. यादरम्यान तेजस, सुखोईसह वायुदलाच्या इतर विमानांचा एअर शोमध्ये सहभाग होता. अखेरीस राफेल विमानांना वॉटर कॅनेन सॅल्यूट देण्यात आला. भारतीय हवाई दलात नवीन लढाऊ विमान सामील होते त्यावेळी याच प्रक्रियेचे पालन होते.
फ्रान्समधून 29 जुलै रोजी पाच राफेल लढाऊ विमान भारतात पोहोचले होते, परंतु अधिकृतरित्या आज त्यांचा हवाई दलात समावेश झाला. या सोहळ्यात अंबाला एअरबेसवर सीडीएस जनरल बिपिन रावत, वायुदल प्रमुख आर के एस भदौरियाही उपस्थित होते. वायुदलाला फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमानं मिळणार आहे, त्यामधील पहिल्या बॅचमध्ये पाच विमानं मिळाली असून आणखी पाच विमानं पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
वायु दलात राफेल लढाऊ विमाने ही गोल्डन एअरो 17 स्क्वॉड्रनमध्ये सामील केली जाणार आहेत. याच स्क्वॉड्रनने कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता पुन्हा एकदा अंबाला एअर बेसवरील राफेल विमानांची हजेरीच शत्रूला धडकी भरवू शकते. सध्या चीन आणि पाकिस्तानसोबत भारताचा तणाव सुरु आहे. सीमेपासून अंबाला एअरबेस जवळ आहे. अशा स्थितीत डावपेचानुसार राफेलची तैनाती भारतासाठी उपयोगाची ठरेल असे सांगण्यात येत आहे.