मुंबई – राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने बहुमताची पहिली फेरी जिंकली असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या सरकारच्या बाजूने 164 आमदारांचे पाठबळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले. त्यांना 164 मते पडली तर त्यांचे विरोधी शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते पडली.
नार्वेकर हे मुंबईतील आमदार असून ते सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. त्यांचे वय 45 वर्षांचे आहे. विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या सभापतीपदी त्यांचे सासरे रामराजे नाईक हे आहेत. जावई विधानसभेचा अध्यक्ष आणि सासरे विधान परिषदेचे सभापती असा योगही यानिमीत्ताने प्रथमच जुळून आला आहे.
राज्य विधानसभेचे हे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आज पासून सुरू झाले. त्यात उद्या सोमवारी एकनाथ शिंदे सरकारच्या बहुमताची परिक्षा होणार आहे. पण सरकारच्या मागे नेमके किती संख्याबळ आहे हे आज होणाऱ्या विधान सभा अध्यक्षांच्या निवडीवर सिद्ध होणार होते. त्यानुसार आजच्या निवडणुकीत सरकारच्या बाजूने 164 आमदार असल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदान केले नाही. कारण ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटले आहे की शिवसेनेने व्हीप बजावलेला असताना शिवसेनेच्या काही आमदारांनी तो पाळला नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे.
दरम्यान आजच्या मतदानाला 12 आमदार अनुपस्थीत राहिले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे सदस्य आजारी असल्याने ते आजच्या मतदानाला उपस्थित राहु शकले नाहीत.नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन सदस्य सध्या तुरूंगात आहेत त्यामुळे तेही मतदानाला येऊ शकले नाहीत. एमआयएम पक्षाचे मुफ्ती महंमद इस्माईल हेही आज सभागृहात हजर नव्हते.समाजवादी पक्षाचे सदस्य रईस शेख, अबु आझमी, आणि एमआयएम पक्षाचे शाह फारूख यांनी मतदानात भाग घेतला नाही. कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे याही आजच्या मतदानाला उपस्थित नव्हत्या.
शिंदे गट आणि भाजपची संयुक्त बैठक
गेले अनेक दिवस सूरत, गुवाहाटी आणि गोवा येथे बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आजही मुक्त सोडण्यात आलेले नाही. त्यांना विधानभवना जवळच्याच एका हॉटेलात ठेवण्यात आले असून त्यांना आज प्रचंड बंदोबस्तात विधीमंडळाच्या आवारात आणण्यात आले होते. या प्रकारावर आदित्य ठाकरे यांनी आज सभागृहात जोरदार टीका केली.
शिंदे गट आणि भाजपची संयुक्त बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पार पडली. याठिकाणी उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाताना काय रणनीती असायला हवी, याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीला भाजपचे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याची माहिती समजते.