तृतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट ‘कोती’तून उलघडणार

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ओएम आर्ट्स निर्मित ‘कोती’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक महत्त्वाचा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट महत्त्वाचा आहे.

“कोती” चित्रपटाचा विषय हा तृतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट असलेला आहे. आपल्या भावाला समाज का झिडकारतो या विचारातून त्या विरोधात दुसऱ्या भावाने लढा या आशययसूत्रावर ‘कोती’ बेतला आहे. दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांचा विषय हाताळलेला नाही. या पार्श्वभूमीवर, ‘कोती’ महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये चित्रपटाचा गौरव झाला आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. भारत सरकारने कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार पटकावले आहेत.

आज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे, संजय कुलकर्णी, विनीता काळे, मोहिनीराज गटणे यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ओएम आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनीता पोटे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास भोसले यांनी केलं आहे. वाळू माफियांवर आधारित रेती या चित्रपटातून भोसले यांनी लक्ष वेधून घेतलं होतं.

‘कोती’ हा ह्रदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटानं अनेक मानसन्मान मिळवून दिले. अतिशय महत्त्वाचा विषय चित्रपटात हाताळण्यात आला आहे. महोत्सवांमध्ये कौतुक झाल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाचं कशा पद्धतीनं स्वागत करतात या विषयी उत्सुकता आहे. महत्त्वाच्या विषयासह नातेसंबंध, सामाजिक दृष्टिकोन अशा पद्धतीनं चित्रपटाची मांडणी केली आहे. या चित्रपटानंतर समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षा आहे, अशी भावना दिग्दर्शक सुहास भोसले यांनी व्यक्त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)