केरळ : सध्या सोशल मिडियावर आई कुटुंबासाठी किती कामे करते, याचे केरळमधील एका मुलाने काढलेले चित्र सुपरहिट ठरले आहे. अनुजथ सिंधु विनयल या 14 वर्षाच्या मुलाने आईचे निधन झाल्यानंतर हे चित्र काढल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याने हे चित्र दोन वर्षांपूर्वीच काढलेले आहे. मात्र त्याच्या या चित्राला शंकर्स अकॅडमीने घेतलेल्या स्पर्धेत गेल्या वर्षीच्या अखेरीस पारितोषिक जाहीर झाले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार के. शंकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेतली जाते.
अनुजथने या चित्राला ‘माय मदर अँड द मदर्स इन द नेबरहुड’ (My mother and mothers in the neighbourhood) असे नाव दिले आहे. मात्र सध्या त्याचे कुटुंब अतिशय दुःखद आणि विचित्र परिस्थितीतून जात आहे. अनुजथच्या चित्राला पारितोषिक मिळाल्याची बातमी त्याच्या आईला समजली होती. मात्र त्या चित्राला मान्यता मिळून अनुजथचे कौतुक होत असल्याचे पाहण्यासाठी ती या जगात नाही.
हृदयाशी संबंधित व्याधीमुळे त्याच्या आईचे नुकतेच निधन झाले. अनुजथ हा केरळमधील त्रिसूरचा. त्याचे वडील विनयल हे व्यावसायिक डिझाईनर आहेत. पत्नीचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मुलाने काढलेले ‘माय मदर’ चित्र व्हॉटस्अप स्टेटसला ठेवले आणि ते व्हायरल झाले.
अभ्युदय या मोठ्या भावाप्रमाणेच अनुजथलाही लहानपणापासून चित्रे काढण्याची आवड आहे. चित्रकलेचे त्याने कधी प्रशिक्षण घेतले नाही पण आजूबाजूची दृश्ये पाहून चित्रे काढण्याची त्याला सवय लागली.
नऊ वर्षाचा असतानाच त्याच्या चित्रासाठी क्लिंट मेमोरियल इंटरनॅशनल अवार्ड मिळाले होते. 2016 मध्ये बालदिनी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. बालदिनाची ही आठवण त्याने जपून ठेवली. मात्र तीन वर्षानंतर बालदिन झाल्यावर तीनच दिवसांनी त्याच्या आईचे निधन झाले.
आई आणि शेजारी राहणाऱ्या महिला दिवसभर काय कामे करतात, हे पाहून त्याला आईच्या कामाविषयीचे चित्र काढण्याची प्रेरणा मिळाली होती. त्याच्या आईलाही त्याचे हे चित्र आवडले होते. आता त्याचे हे चित्र केरळ सरकारच्या ‘2020-21’ च्या जेंडर बजेटच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे.