चित्रांतून उलगडली कारगिल युद्धाची शौर्यगाथा

– कल्याणी फडके

पुणे – भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने आपल्या शौर्याने विजय मिळविला. युद्धातील विजय साजरा करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत देशाच्या चारही दिशांमध्ये कारगिल युद्धाच्या चित्ररूपी आठवणी दाखविण्यासाठी 10 रेल्वे गाड्या धावल्या.

3 मे ते 26 जुलै या कालावधीमध्ये झालेल्या युद्धात अनेकांना वीरमरण आले होते. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याने दाखविलेले शौर्य या युद्धाची भीषणता, या युद्धात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान या सर्वांना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी तसेच कारगिलच्या युद्धाबाबत सर्वांना माहिती मिळावी, या हेतूने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कारगिल युद्धाच्या शौर्य आणि साहसी कथा छायाचित्रांच्या माध्यमातून प्रवाशांना पाहता आल्या. भारताच्या सर्व भागांमध्ये हा संदेश पोहोचावा, यासाठी देशातील विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांची निवड करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.

रेल्वेनेही जागवल्या आठवणी…
निजामुद्दीन ते पुणे मार्गावर धावणाऱ्या एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेसचा समावेश या “विशेष’ गाड्यांमध्ये केला होता. ही रेल्वेगाडी दर शुक्रवारी निजामुद्दीन स्थानकातून निघते आणि शनिवारी पुण्यामध्ये दाखल होते. तर पुण्यातून रविवारी निघून सोमवारी निजामुद्दीन येथे पोहोचते. या “विशेष’ गाडीमध्ये प्रवाशांना “कारगिल विजय दिवसा’च्या आठवणी पाहता आल्या. रेल्वेच्या नियोजनानुसार दिल्ली विभागांतर्गत या गाडीमध्ये छायाचित्र बसविण्यात आली होती, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

या होत्या विशेष गाड्या
निजामुद्दीन-पुणे एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस
ब्रह्मपुत्र मेल
सीमांचल एक्‍स्प्रेस
गोंडवाना एक्‍स्प्रेस
नांदेड – अंबअंदौरा सुपर फास्ट एक्‍स्प्रेस
अमृतसर-कुचुवेल्ली एक्‍स्प्रेस
काशी विश्‍वनाथ एक्‍स्प्रेस
स्वराज एक्‍स्प्रेस
सर्वोद्‌य एक्‍स्प्रेस
श्री वैष्णो देवी कटडा-हापा एक्‍स्प्रेस
श्री वैष्णो देवी कटडा-जामनगर एक्‍स्प्रेस
गोवा संपर्क क्रांती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)