“100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह अनेकांना ठाऊक होती”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर आता भाजपकडून सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहे. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच ठाकरे सरकार हे पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेले आहे. ठाकरे सरकारने कितीही साळसूदपणाचा आव आणला तरीही आता ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा खुलेआम पर्दाफाश झाला आहे. आता केवळ अनिल देशमुख यांनी राजीनामा न देता संपूर्ण ठाकरे सरकारने पायउतार व्हावे. अनिल देशमुख यांची 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार सर्वांना ठाऊक होती, परंतु सर्व गप्प होते, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी, महाराष्ट्राची अशी बदनामी करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा आजिबात अधिकार नाही. जर थोडीही लाज शिल्लक असेल तर ठाकरे सरकारने त्वरित राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची सार्वजनिक स्वरुपात माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.