वाचा…’कहाणी एका आदर्श गावाची’

– विनिता शाह

देशातील प्रत्येक खेडेगाव हे आदर्श गाव व्हावे यासाठी सरकारी पातळीबरोबरच ग्रामीण पातळीवरही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे आहे. मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला अनेक खेड्यात दिसून येतो. दिवसदिवस वीज नसते, मैलोनमैल पायी जाऊन पाणी आणावे लागते, दुष्काळात तर गावाची स्थिती अधिकच शोचनीय होते, शाळांची बकाल अवस्था, शिक्षणाबद्धलची अनास्था, वाहतुकीची अपुरी व्यवस्था, तंत्रज्ञानाचा अभाव, या सर्वच उणिवांनी घेरलेल्या गावातील दरडोई उत्पन्नही पोटापुरतेच असते. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील बारखेडा गाव हे याच पंक्तीत बसणारे. विकासापासून वंचित असणारे या गावाचा कायापालट करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आणि आज हेच गाव मध्य प्रदेशातील आदर्श गाव म्हणून नावारूपास आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जेमतेम 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न घेणाऱ्या या गावात सुविधांची वानवा आणि स्रोतांकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता गावकऱ्यांनी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वत:च कात टाकली असून बारखेडा हे दारूमुक्तही गाव ठरले आहे. स्वयंशिस्त आणि स्वयंशासनमुळे गावकऱ्यांत आत्मविश्‍वास निर्माण झाला. शाळा आणि अंगणवाडी शाळांच्या प्रगतीबरोबरच समान स्रोतांचे उदा. जंगल, तलाव आणि धरणाचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले गेले.

आदर्श गाव झाल्यानंतरही बारखेडा गावात दारूची समस्या होती. त्यामुळे गाव दारूमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने दारूमुक्त अभियान राबवण्यात आले. या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावाच्या मध्यवर्ती चौकात नाटक किंवा आवाहनुसार कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त अभियानही यशस्वीपणे राबवण्यात आले हाते. तसेच प्रौढ शिक्षण, आरोग्य जनजागृती, स्वच्छ पाण्याचे महत्त्व, उपलब्ध स्रोताचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारी यंत्रणाही तितकीच कामाला लागली होती. त्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज बारखेडा गाव आदर्श म्हणून ओळखले जाते.

बदलाची प्रक्रिया : ग्रामसभेकडून गावचा विकास होत नसल्याचे पाहून गावकऱ्यांनी एकमुखाने विद्यमान मंडळ हटवण्याची जोरदार मागणी केली आणि त्यानुसार ग्रामपंचायतील सरपंच, सदस्यांना बाजूला करण्यात आले आणि लोकांतून नव्याने सभेची स्थापना करण्यात आली. तसेच पाण्याचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापन समिती नेमण्यात आली. हीच समिती आता गावच्या विकासकामावर देखरेख ठेवत आहे. पाण्याचा वापर आणि उपसा यावर नियंत्रण ठेवण्यात आले असून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली गेली. शेतीला समान पाणी वाटप तंत्र निश्‍चित करण्यात आले. पाणीवाटपातील भेदभाव संपवण्यात आला.

गावकऱ्यांच्या समितीने गावातच शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शाळेची इमारत बांधण्यास पुढाकार घेतला. सार्वजनिक क्षेत्रातील विविध बॅंकांच्या कामकाजाचे तसेच सरकारी कामकाजाचे केंद्रीकरण करण्यात आले आणि ते गावातील काही तरुणांना सोपवण्यात आले. त्यामुळे एकाच ठिकाणी शासकीय, निमशासकीय आणि बॅंकेचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाली. किरकोळ कामासाठी गावकऱ्यांना अन्य ठिकाणी जावे लागत होते किंवा बिछया येथील प्रशासकीय गट कार्यालयात जावे लागत होते; परंतु हिच सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांच्या चकरा थांबल्या.

बाराखेडापासून प्रेरणा: बाराखेडा गावाचा झालेला कायापालट पाहून शेजारील गावांनी देखील बाराखेडापासून प्रेरणा घेत बदलाची कास धरली. अनेक गावांनी पाणी व्यवस्थापन धोरण अवलंबले. मच्छीमार व्यवसायासाठी पाणी व्यवस्थापन फायद्याचे ठरले. बिछया गट पंचायतीने या कामावर लक्ष ठेवले. मध्य प्रदेशातील अनेक गावातील तलाव हे देखभालीअभावी कोरडेठाक पडले आहेत.

थोंडा पंचायत समितीअंतर्गत असलेल्या खेरोटोला गावातील स्थिती देखील अशीच होती, मात्र खेरोटोला गावातही गावकऱ्यांनी विकासाभिमूख प्रशासन यंत्रणा राबवली आहे. कालांतराने या बारखेडा आणि खेरोटोला येथील विकासकामांपासून प्रेरणा घेत बिछया पंचायत समितीतंर्गत असलेले 90 गावातील ग्रामपंचायतीची जागा स्वयंशासनाने घेतली आहे. स्वयंशासनाच्या माध्यमातून ही खेडी एकमेकांशी जोडली गेली. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांत सुधारणा केली गेल्याने दळणवळण व्यवस्था विकसित गेली. गावांतर्गत व्यवहाराला एकप्रकारे चालना मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)