बेल्हे : जुन्नर तालुक्यातील औरंगपूर, जाधववाडी, निमगाव सावा,साकोरी, बेल्हे या गावांना मंगळवार (दि 16) रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे घराचं तसेच शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाला आहे. निमगाव सावा येथील भापकर वस्तीवरील बाळू भापकर, पांडुरंग भापकर, संभाजी भापकर यांच्या घराची कौले उडून गेली आहेत. गणपत घोडे यांच्या पपई च्या बागेचे नुकसान झाले आहे.
या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक विजेचे खांब या वादळाने पडले आहेत. वादळाची तीव्रता एवढी भयानक होती की, विजेचे लोखंडी खांब सुद्धा या वादळाने मधून वाकले आहेत. मंचर- निमगाव सावा रस्त्यावरती मोठे भाबळीचे झाड पडल्यामुळे हा रस्ताही वाहतुकी साठी बंद झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष घोडे व नागरिकांच्या माध्यमातून ही भाबळ रस्त्यावरून हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. निमगाव सावातील बबन थोरात, मारुती थोरात, गणपत घोडे,बाबाजी भापकर, संभाजी भापकर, बाळू भापकर, पांडुरंग भापकर या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच परिसरात नुकसानीचा आढावा घेण्याच काम रात्री उशिरापर्यंत चालू होतं.