अर्थसंकल्प सादर होण्यापुर्वी शेअर बाजारात घसरण

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता तो सादर करतील. देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची मंदगती पाहता सरकार त्यात उत्साहाचे वातावरण आणण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शेअर बाजारावरही याचे सावट असून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्‍स 140 अंकांनी कोसळला असून निफ्टीची 126.50 अंकांची घसरण झाली आहे.


तज्ज्ञांच्या मतानुसार, दीर्घकालीन भांडवली नफ्यात विशेष सूट मिळणार नाही. त्याशिवाय प्राप्तिकरातही दिलासा मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसते. आज सकाळी बाजार खुला झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंजचा निर्देशांक (सेन्सेक्‍स) 140 अंकांनी कोसळला आणि 40,576 वर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्‍स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी) 126.50 अंकांनी कोसळला आणि 11,910 वर स्थिरावल्याचा पहायला मिळाला.

मोदी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आजवरच्या 6 अर्थसंकल्पांपैकी 4 वेळा शेअर बाजारात घसरण झालेली पहायला मिळाली आहे. अर्थव्यवस्थेसाठी संकेत मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारातील कमजोरी ही यंदाच्या अर्थसंकल्पासाठी चांगला संकेत मानता येणार नाही. याचाच अर्थ गुंतवणुकदारांना सरकारच्या धोरणांवर किंवा अर्थसंकल्पाच्या घोषणांबाबत विशेष अपेक्षा नाहीत, हे यातून प्रतित होते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.