मुंबई – गेल्या पंधरवड्यात बरीच विक्री होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर आहेत. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दीर्घ पल्ल्याचा विचार करून निवडक खरेदी करणाऱ्यांनी संधीचा फायदा घ्यायचे ठरविले आहे. त्यामुळे बुधवारी शेअर बाजार निर्देशांकांत भरीव वाढ नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 619 अंकांनी वाढून 57,684 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 183 अंकांनी म्हणजे 1.08 टक्क्यांनी वाढून 17,166 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, स्टेट बॅंकेसह इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र डॉ. रेड्डीज, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एअरटेल, टायटन या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1 टक्क्यांपर्यंत वाढले.धातू, ऊर्जा, बॅंकींग, वाहन, क्षेत्रांचे निर्देशांक वाढले तर आरोग्य, दूरसंचार, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 5,445 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
विश्लेषकांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यातील पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स 57.6 अंकांवर गेला आहे. दुसऱ्या तिमाहीचा विकास दर 8.4 टक्के इतका मोजला गेला असून संपूर्ण वर्षाचा विकास दर 9.5 टक्क्यांपेक्षा जास्त होईल असे स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. नव्या करोनाची परिणामकारकता कमी असण्याचे संकेत मिळत आहेत.
जीएसटी संकलन 1.31 लाख कोटी रुपयावर गेले आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराबरोबरच जागतिक शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण होते. युरोप, चीन, दक्षिण कोरिया, जपान, हॉंगकॉंग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांनीही खरेदी केली.
सावध राहण्याची गरज
भारतातील स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्यामुळे काही गुंतवणूदारांनी खरेदीचे धाडस केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वाढले आहेत. मात्र अमेरीकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे व भांडवल सुलभता कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर नव्या करोनामुळे जागतीक व्यापारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही काळ तरी गुंतवणूदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे रेलीगेअर ब्रोकींगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.