शेअर बाजार निर्देशांक कोसळले

क्रूड उत्पादक सौदीतील आगीचा परिणाम : गुंतवणूकदारांचे 2.72 लाख कोटींचे नुकसान

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था मंदी आणि जागतिक व्यापार युद्धाशी झुंज देत असतानाच जगातील सर्वात जास्त क्रूड उत्पादन करणाऱ्या सौदी अरेबियातील तेलांच्या विहीरींना लागलेल्या आगीचा शेअर बाजार निर्देशांकावर नकारत्मक परिणाम झाला. तेलाच्या किंमती वाढल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर आणखी परिणाम होईल, या शक्‍यतेने शेअर बाजारात मंगळवारी तुफान विक्री झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 642 अंकांनी म्हणजे 1.73 टक्‍क्‍यांनी कोसळून 36481 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंकांनी कोसळून 10817 अंकांवर बंद झाला. वाहन, रिऍल्टी, धातू, बॅंकिंग, वित्त, तेल आणि नैसर्गिक वायू, उर्जा, तंत्रज्ञान, माहीती तंत्रज्ञान या क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक 4 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप 1.84 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले.

शेअर बाजार निर्देशांक मंगळवारी पावणे दोन टक्‍क्‍यांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे एकच दिवसात तब्बल 2.72 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 2.72 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते 1,39,70,356 कोटी रुपयांवर आले. आगामी काळातही शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्‍यता विश्‍लेषकांनी व्यक्‍त केली.

रुपया कोसळला
भारत आपल्या गरजेच्या 90 टक्के क्रूड परकीय चलन मोजून आयात करतो. त्यामुळे आयातीचा खर्च वाढून भारताची चालू खात्यावरील तूट्‌ आणखी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे डॉलरची विक्री होऊन रुपयाचे मूल्य कोसळले. व्यापार युद्ध आणि मंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रुपयाचे मूल्य कमी होत आहे. मंगळवारी रुपयाचे मूल्य आणखीन 18 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव प्रति डॉलरला 71.78 रुपये इतका झाला.

इंधनाचे दर वाढले
सौदी अरेबियाने सध्याच्या परिस्थितीतही भारताला क्रूडचा पुरेसा पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले असले तरी भारतातील तेल कंपन्यांनी मंगळवारी इंधनांचे दर वाढवले. पेट्रोलचा दर 14 पैशांनी वाढून 72.17 रुपये प्रति लीटर करण्यात आला आहे. तर डिझेलचा दर 15 पैशांनी वाढवून 65.58 रुपये प्रति लीटर करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. जागतिक बाजारात क्रडचे दर 30 वर्षात प्रथमच एका दिवसात (मंगळवारी) 20 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×