शेअर बाजार निर्देशांक कोसळले

सरकारने जाहीर केलेल्या सुमार पॅकेजचा परिणाम

मुंबई – अमेरिकेत दुसरे पॅकेज देण्याची शक्‍यता मावळली आहे. भारताने जाहीर केलेले दुसरे पॅकेज अपेक्षा अपेक्षाभंग करणारे आहे. त्याचबरोबर विविध देशात करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले.

गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1,066 अंकांनी कोसळून 39,728 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 290 अंकांनी कोसळून 11,680 अंकावर बंद झाला.

गेल्या दहा दिवसांपासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढत होते. बरेच विश्‍लेषक करेक्‍शनची शक्‍यता व्यक्त करीत होते. अमेरिकेची निवडणूक होईपर्यंत म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत आता अमेरिकन सरकार किंवा फेडरल रिझर्व पॅकेज जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत सरकारने मागणी वाढविण्यासाठी जाहीर केलेले पॅकेज अपेक्षाभंग करणारे आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना खर्च वाढविण्यासाठी उचल म्हणजे ऍडव्हास देण्यात आला आहे. त्यात राज्यांना पायाभूत सुविधांसाठी कर्ज देण्याची भाषा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची क्रयशक्ती वाढणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटते.

त्याचबरोबर फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे या देशांनी लॉकडाऊन सुरू करण्याची तयारी केली आहे. काल पॅरिसमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रुग्ण वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे जागतिक पातळीवर विक्रीचा जोर वाढला आहे.

गेल्या दहा दिवसांत झालेल्या खरेदीचा फायदा माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्राला झाला होता. मात्र आज झालेल्या जोरदार नफेखोरीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाल्याचे दिसून आले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.