मुंबई – महागाई आणि रशिया- युक्रेन युध्दामुळे विविध देशांच्या विकास दरावर नकारात्मक परिणाम होणार आहे. कंपन्यांच्या नफ्यात घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 105 अंकांनी कमी होऊन 54,364 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 61 अंकांनी म्हणजे 0.38 टक्क्यांनी कमी होऊन 16,240 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील, सन फार्मा, टायटन, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, इंडसइंड बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
जपान, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया या देशातील निर्देशांक कमी झाले तर चीनमधील निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाली. युरोपीयन शेअर बाजाराचे निर्देशांकही वाढले होते. मात्र अमेरिकेच्या शेअर बाजार निर्देशांकांत बरीच घट नोंदली गेली. परकीय संस्थागत गुंतवणूकदारानी काल 3,361 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी आज शेअर बाजारानी जारी केली.
हेम सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक मोहित निगम यांनी सांगितले की युद्ध आणि महागाई बरोबरच चीनमधील बऱ्याच शहरांमध्ये लॉकडाउन जारी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर गेल्या तीन दिवसापासून होत आहे. नजीकच्या भविष्यात या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.