शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही नफेखोरी

मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार नफा काढून देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी नफेखोरी होऊन निर्देशांकात घट नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 456 अंकांनी कमी होऊन 61,259 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.83 टक्‍क्‍यानी म्हणजे 152 अंकांनी कमी होऊन 18,266 अंकांवर बंद झाला.

सरकारी बॅंक क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. निर्देशांक सध्या आवश्‍यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर असल्यामुळे अशा प्रकारचे करेक्‍शन अपेक्षित होते असे झाले एलकेपी सिक्‍युरिटीजचे विश्‍लेषक एस रंगनाथन यांनी सांगितले. असे असले तरी दीर्घ पल्ल्यामध्ये भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आगेकूच करण्याची शक्‍यता असल्याचे जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

व्याजदर अजूनही व्याजदर कमी पातळीवर आहेत. खासगी गुंतवणूक वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा प्रकारचे छोटे-मोठे करेक्‍शन झाले तर काही गुंतवणूकदारांना खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य निर्देशांकांबरोबरच मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप आणि स्मॉल कॅप 2.31 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले.

जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही भारतीय गुंतवणूकदारांनी मात्र नफेखोरी केली आहे.आज रुपयाच्या मूल्यात तब्बल 47 पैशांची वाढ होऊनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 505 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली आहे. आगामी काळात भारतीय शेअर बाजाराबाबत परदेशी संस्था गुंतवणूकदार काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.