मुंबई: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर शून्य टक्क्याच्या जवळ ठेवले आहेत. मात्र विकास दर लवकर वाढणार नाही असे सांगितले आहे. अमेरिकेमध्ये पुन्हा करोना व्हायरसचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 708 अंकांनी म्हणजे 2.07 टक्क्यांनी कोसळून तो 33,538 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 2.12 टक्क्यानी म्हणजे 214 अंकांनी कोसळून 9,902 अंकांवर बंद झाला. आजच्या जोरदार विक्रीचा फटका एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला.
याबाबत आनंद राठी या संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, फेडरल रिझर्व्हने आर्थिक परिस्थिती लवकर सुधारणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजाराबरोबरच इतर शेअर बाजारावर झाला. एकूणच परिस्थिती लवचीक असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. रिझर्व्हने व्याजदर शून्य टक्क्याच्या जवळ ठेवले आहेत आणि आणखी एक वर्ष तरी व्याजदरात वाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. निर्देशांक कोसळण्याचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होऊन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 20 पैशांनी कमी झाले.