धाकधूक वाढविणारा निकाल ः संपूर्ण राज्याचे लक्ष
बारामती-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाच गटात होत असलेल्या निवडणुकीत एकूण 91.55 टक्के मतदान झाले. 13 हजार 872 सभासद मतदारांपैकी 12 हजार 701 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच गटापैकी सांगवी गटात सर्वाधिक 94.32 टक्के तर नीरावागज गटात सर्वात कमी 89.94 टक्के मतदानाची नोंद झाली. ब वर्ग प्रतिनिधीसाठी सर्वाधिक 98 टक्के मतदान झाले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल धाकधूक वाढविणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कारखान्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून अजित पवार यांनी सर्व शक्ती एकवटली. स्वतः प्रचार सभा घेत मतदानाच्या दिवशी देखील बारामतीतच ठिय्या मांडला. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले. चंद्रराव तावरे गटाने देखील कोणतीही कसर सोडली नाही. पाचही गटात विजयाचा दावा त्यांनी केला आहे, असे असले तरी माळेगावचा सभासद राज्यातील सत्तेच्या पाठीमागे जाणार की, राज्यातील उच्चांकी दराच्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- गटनिहाय मतदान
मालेगाव 90.39 टक्के
पणदरे 92.27 टक्के
सांगवी 94.32 टक्के
नीरावागज 89.94 टक्के
बारामती 91.50 टक्के
ब वर्ग प्रतिनिधी 98 टक्के - दुपारी तीनला येणार पहिला निकाल
बारामती शहरातील भिगवण रोड येथील जयश्री गार्डन येथे निवडणुकीचा निकाललागणार आहे. पाच गटासाठी 45 टेबलवर मतमोजणी होणार आहे. निकालासाठी 120 कर्मचाऱ्यांची फौज कार्यरत असणार आहे. पेटीनिहाय मतमोजणी होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येईल. - दहाच्या नोटीची जादू चालणार?
माळेगावच्या निवडणुकीत “लक्ष्मी’ दर्शन देणार असल्याच्या चर्चेला उत आला होता. मतदानादिवशीच्या शेवटच्या तासात देखील ही चर्चा प्रत्येक गटात रंगली होती. दहाची नोट कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फिरत असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. दहाची नोट म्हणजे टोकन असल्याच्या गप्पा चौकाचौकात रंगल्या होत्या.