सातारा : पाच वर्षाच्या चिमुलीला गॅलरीतून सावत्र आईने फेकून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना म्हसवे, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सावत्र आईवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
जयश्री संतोष जाधव (रा. म्हसवे ) असे गुन्हा दाखल झालेल्या सावत्र आईचे नाव आहे. याबाबत सोनाली संतोष जाधव (रा. गोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पती संतोष आणि सोनालीचे पटत नसल्यामुळे संतोषने दुसरे लग्न जयश्रीसोबत केले. संतोष आणि जयश्री हे दोघे म्हसवे येथील एका अपार्टमेंटमध्ये राहात आहेत. तर सोनाली गोडोली येथे राहात आहे. त्या दोघांकडे सोनाली यांची पाच वर्षाची मुलगी राहत आहे.
दि. १९ रोजी पाच वर्षाच्या चिमुकलीला जयश्रीने गॅलरीतून खाली फेकले. यामध्ये ती जखमी झाल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार चिमुकलीची आई सोनालीला समजल्यानंतर तिने पोलिसांना सोबत घेऊन दवाखान्यात गेली. त्यावेळी पाच वर्षाच्या चिमुकलीने आईला ‘मला जयश्री आईने गॅलरीतून खाली फेकले असे सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनी तत्काळ सोनाली जाधव यांची तक्रार नोंदवून घेत सावत्र आई जयश्री जाधववर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.