भुवनेश्वर – ओडिशा सरकारने आपल्या राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड वॉरिअर्सचा दर्जा घोषित केला आहे. मुख्यमंत्री पटनाईक यांनी म्हटले आहे की ऐन करोना काळातही या विषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकार फिल्डवर निडरपणे काम करीत आहेत. त्यांनी उत्तम सेवेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचे हे काम एक प्रकारे कोविड विरोधी कार्यच आहे.
राज्यात एकूण 6944 शासकिय अधिस्वीकृत पत्रकार आहेत. त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यांना 2 लाखांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. कर्तव्य बजावत असताना ज्या पत्रकाराचा कोविडने मृत्यू होईल त्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची मदतही दिली जाणार आहे.
तसेच लसीकरणातही त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ओडिशात आत्तापर्यंत 11 पत्रकारांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.