छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत पुनर्रस्थापित करणार

कर्नाटक प्रशासनाला उपरती

बेळगाव (प्रतिनिधी) – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील मुख्य चौकात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रशासनाने रातोरात हटवल्यानंतर आज बेळगावसह पश्‍चिम महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद म्हटले.

दरम्यान प्रशासनाने पाठवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुनर्स्थापित करावा या मागणीसाठी मनगुत्ती गावासह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने दिवसभर मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन तासांपेक्षा अधिक काळ स्थानिक, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत आठ दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावांमध्ये 5 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. याला ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. परंतु कन्नड भाषिक नागरिकांच्या दबावामुळे रातोरात संपूर्ण परिसरातील लाईट घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. तसेच चबुतराही काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कागदात बांधून ठेवण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बेळगावसह सीमा भागामध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर ती उमटले. 

दोन दिवसांपासून मनगुत्ती या गावातील तणाव वाढत होता. आज सकाळपासूनच गावातील महिला, तरुण संख्येने गावातील चौकात जमले होते. यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तर काही कन्नड भाषिक लोकांनी मराठी भाषिक महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. यानंतर पोलिसांना मध्यस्थी करत दोन्ही जमावाला बाजूला करण्यात यश आले. 

अखेर बेळगाव पोलीस, जिल्हा प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ बैठक झाली. आठ दिवसाच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी पुनर्रस्थापित केला जाईल, असा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, मनगुत्ती गावात तणावपूर्ण शांतता असून गावाला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.