Chhatrapati Shivaji Maharaj । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. या पुतळ्याचे वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.अशात समुद्र किनारी असलेला पुतळा पडल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेवरून उद्धव ठाकरे गटाकडून रवींद्र चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार वैभव नाईकांनी संताप व्यक्त करत मालवणमधील PWD ऑफिसची तोडडफोड केली आहे. या पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होत. मात्र या घटनेमुळे सरकारच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
तर सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून महायुती सरकारवर सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडियावर मालवण किल्ल्यावरील दुर्घटनेबाबत पोस्ट करत सरकारला सुनावले आहे. तसेच हा पुतळा उभारण्याचे काम राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवले होते, अशी माहिती सुळे यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमधून दिली आहे. त्यामुळे आता ज्या कंत्राटदाराला हे काम दिले होते. त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत… https://t.co/GMHKxiDzah pic.twitter.com/lmacA8HKZZ
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024
तत्पूर्वी, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुद्धा गेल्या काही महिन्यांपूर्वी पुतळा हा योग्य रित्या उभारला गेल्या नसल्याची तक्रार केली होती. तसेच या पुतळ्यावर संभाजीराजे छत्रपतींनीही आक्षेप घेत पंतप्रधान मोदीं पत्र लिहिले होते.
संभाजीराजे छत्रपती यांची सोशल मीडिया पोस्ट करत समोर आणलं पंतप्रधानांना लिहिलेलं ‘ते’ पत्र
‘पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार !
आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.’