पुणे – शहरातील अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला आहे. त्या अंतर्गत आठवड्यातून एक दिवस प्रत्येक सहायक आयुक्तांना संपूर्ण दिवसभर कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. परिणामी कारवाईस अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने अतिक्रमण थांबविण्यासाठी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना येणाऱ्या फोन कॉल्सची माहिती नोंद केली जाणार आहे. शहर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या स्टेशन डायरीच्या धर्तीवर या नोंदी घेण्यात येणार असून ही माहिती गुप्त ठेवेणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. महापालिकेकडून त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करताच राजकीय नेते, स्थानिक कार्यकर्ते तसेच अनेकदा काही शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही कारवाई थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करून दबाव आणला जातो, तसेच धमक्याही दिल्या जातात. त्यामुळे प्रशासनाला दबावापोटी कारवाई मागे घ्यावी लागते. त्यामुळे यापुढे अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभाग कारवाईदरम्यान आलेल्या प्रत्येक कॉल्सचे रेकॉर्ड तसेच मोबाइल क्रमांक स्टेशन डायरीमध्ये नोंद करणार आहे. या नोंदी नियमितपणे करण्याच्या सूचना अतिक्रमण निरीक्षकांना सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने आता या नोंदी ठेवणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक केले जाणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.