भाजपकडूनही इंदुरीकरांच्या वक्तव्याचा निषेध
मुंबई : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून एकच गोंधळ निर्माण झाला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वेगवेगळे मते मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता. ओझर येथे झालेल्या किर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं इंदुरीकर महाराजांनी म्हणाले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला होता. या आरोपानंतर महाराष्ट्रात वाद निर्माण झाला.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, इंदुरीकर महाराजांची कीर्तनं जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ते विधान करायला नको होते. इंदुरीकर महाराजांनी केलेले ते विधान चुकीचेच आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण, एका वाक्याने व्यक्ती खराब होत नाही. एका वाक्याने माणसाची तपश्चर्या घालवू नका, असे आवाहन पाटील यांनी केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविषयी पाटील म्हणाले, राष्ट्रवादीेचे नेते वारंवार खोटे बोलत आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही. हे सरकार आपोआप पडेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवावे असे आव्हान भाजपाला दिले होते. त्याला पाटील यांनी उत्तर दिले.