Varsha Gaikwad | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होताना पाहायला मिळणार आहे. दोन्हीमध्ये सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे.
मात्र असे असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून देखील अनेकदा चर्चा रंगल्या. यातच उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या महिला झाल्या पाहिजेत असं वक्तव्य खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल, असं विधान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. त्यांनी थेट नावं घेत हा मान कोणाला मिळू शकतो, यासाठी कोण पात्र ठरू शकते यावरही भाष्य केले आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री होत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री अद्यापपर्यंत का नाही? त्यामुळे महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार केला पाहिजे अशी माझी भूमिका असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
कोणत्या महिला मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम आहेत त्यांची थेट नावच वर्षा गायकवाड यांनी घेतली. “राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटातून रश्मी ठाकरे यांच्यासहीत काँग्रेसमध्येही काही महिला या पदासाठी सक्षम आहेत. मी महिला म्हणून माझं मत मांडत आहे. मी कालसुद्धा तीच भूमिका मांडली की, महिला म्हणून नक्कीच आम्हाला आमचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. प्रत्येक पक्षामध्ये सक्षम महिला आहेत,” असे वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.
“आमच्या पक्षात एक पद्धत अवलंबली जाते. आमदार निवडून येतात तेव्हा ते एकत्र येऊन निर्णय घेतात. पक्षाचा निर्णय हा सर्वात मोठा असतो. कार्यकर्ता म्हणून त्यात आमची भूमिका राहते. एक महिला म्हणून मला नक्कीच वाटतं की महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. शेवटी हा निर्णय पार्टीचा असून पार्टी तो निर्णय घेत असते,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण ५० टक्के आरक्षणही लागू केले असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे,भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही,” असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.