मुंबई – करोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. वैद्यकीय आघाडीवरही युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या संकटामुळे आर्थिक समस्या उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या संकटप्रसंगी राज्य शासनासोबत काम करण्यासाठी शिवेसना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाचे विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करणार आहेत. तर शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला व राष्ट्रवादीचे खासदार आपले एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.
करोनाच्या संकटात मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सुनियोजित पद्धतीने उपाययोजना करत आहे. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरीने सहाय्य करीत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर व गोरगरीब जनतेला या निधीचा निश्चित फायदा होईल, असा आशावाद देसाई यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे संबंधितांनी धनादेश जमा करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी कॉंग्रेस जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सदर धनादेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.