मध्यप्रदेश सरकारचा दिवाळीपूर्वी एक मोठा निर्णय
नवी दिल्ली : जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनला मागच्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर चांगलाच विरोध सोसावा लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही आपली भूमिका चीनच्या बाबतीत स्पष्ट केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात चिनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यप्रदेश सरकारने दिवाळीपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीवर विना परवाना पूर्णपणे बंदी आहे. डायरेक्ट जनरल फॉरेन ट्रेडद्वारे चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीसाठी कोणतेही परवाने देण्यात आले नाहीत, असे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे.
मध्यप्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजौर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसंच या फटाक्यांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी यासंदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये चिनी फटाके आणि त्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच त्याचा वापर केल्यास संबंधितांवर एक्स्प्लोसिव्ह ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरंदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच दिवाळीदरम्यान मातीच्या पणत्यांची खरेदी करावी जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.