चाकण (वार्ताहर): भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या केली जाते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात असतानाही या कुटुंबाच्या भेटीला आले नाही. यावरुन या राज्य सरकारमध्येही संवेदनशीलता राहिली नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडीतील एका 17 वर्षीय मुलीला शुक्रवारी (दि. 24) विवस्त्र करुन निघृणपणे हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 26) दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, माजी आमदार संजय भेगडे, उमा खापरे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील आदी उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. कायद्याचा धाक कुणालाही राहिला नाही. राज्यात बलात्कार, विनयभंग अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. घटनास्थळी भेटीही दिल्या जात नाही, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.
आईने फोडला हंबरडा
माझ्या मुलीची विवस्त्र करुन हत्या करण्यात आली. मात्र, देशातील एकाही मुलीवर असा निर्घुण अत्याचाराची वेळ येऊ नये, असा हंबरडाच पीडित मुलीच्या आईने प्रवीण दरेकर यांच्या समोर फोडला.
कुटुंबावर बहिष्कार ही लाजिरवाणी बाब
पीडित मुलीचे शवविच्छेदन करुन गावात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील एकही व्यक्ती सहभागी झाली नाही. अशा दु:खाच्या वेळी कुटुंबावर बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी नमूद केले.