रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारचा ‘मोठा’ निर्णय

जालना – राज्यात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा पाहता रेमडेसिविरचे वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.जालन्यात राजेश टोपे यांच्या हस्ते आज खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्‍टरांना 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्‍शनचे वाटप करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राजेश टोपे म्हणाले, रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून टेंडर पद्धतीने हापकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्‍शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. दुसरा मार्ग प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकीस्ट असणार आहे. हा स्टॉकिस्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करेल. त्याला या इंजेक्‍शनचा पुरवठा केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी नियंत्रणाखाली तो स्टॉकिस्ट खासगी रुग्णालयाची इंजेक्‍शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्‍शनचा पुरवठा करेल. या सर्वावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

तसेच खासगी रुग्णालयांना याप्रकारे सहज रेमडेसिवीर इंजेक्‍शन उपलब्ध होईल. रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्‍शनचा तुटवडा भासणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

लिक्विड ऑक्‍सिजनला पर्याय मिळेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्‍सिजन पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, कोणतेही राज्य या संदर्भात मदत करायला तयार नसून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऑक्‍सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. हाच मार्ग असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या “ब्रेक द चेन’ संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावे. सध्या ऑक्‍सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या 15 दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्‍सिजन शोषून घेणारा प्लांट उभारत आहोत. त्यात यश मिळाल्यास संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लिक्विड ऑक्‍सिजनला पर्याय मिळेल, असेही टोपे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.