पुणे(प्रतिनिधी) : राज्यशासनाने महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली असली तरी या निर्णयामुळे महापालिकेच्या उपायुक्त आणि इतर सर्व विभाग प्रमुखांची दिवाळी कडू होणार आहे.
महापालिकेकेच्या शहर अभियंत्यांसह, इतर सर्व अधिक्षक अभियंत्यांना उपायुक्त, लेखापरिक्षक तसेच विभाग प्रमुखांपेक्षा अधिक वेतन देण्यात आले आहे. त्यामुऴे अधिकारी वर्गामध्ये नाराजीचा सूर असून या निर्णयावरून वेतन आयोगाची अंमलबजावणीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त, कामगार संघटना तसेच पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत महापालिकेच्या 17 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर, नगरविकास विभागाकडून तातडीनं या मान्यतेचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले. मात्र, या पत्रात शासनाने निश्चित केलेल्या वेतनश्रेणी पाहता केवळ शहर अभियंता आणि अधिक्षक अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांनाच सर्वाधिक वेतनवाढ मिळणार आहे.
तर महापालिकेचे उपायुक्त, नगरसचिव तसेच इतर विभागप्रमुखांना अधिक्षक अभियंत्याच्या तुलनेत 2 मेट्रिक्स पे ने कमी वेतन मिळणार आहे. महापालिकेने उपायुक्त तसेच या विभाग प्रमुखांना एस 25 मेट्रिाक्स पे निश्चित केला होता. मात्र शासनाने तो एस 23 द्यावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे, या विभाग प्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक असणार असल्याने सर्वच विभाग प्रमुखांमध्ये नाराजीचा सुर आहे.
हे आहेत शासनाने केलेले बदल…
(1) महापालिकेच्या बढतीवरील अतिरिक्त आयुक्तांना 27 पे मेट्रिक्स असेल
(2) शहरात सध्या कार्यरत असलेल्या शहर अभियंतापदास 29 पे मेट्रिक्स असेल त्यानंतर या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीस 27 पे मेट्रिक्स असेल
(3) मुख्य अभियंत्यांना 27 पे मेट्रिक्स असेल हे अतिरिक्त आयुक्तांच्या समान आहे.
(4) अधिक्षक अभियंत्यांना 25 पे मेट्रिक्स नुसार वेतन असेल
(5) उपआयुक्त, उपायुक्तांशी समकक्ष मुख्य कामगार अधिकारी, मुख्य विधी अधिकारी, मुख्य समाजविकास अधिकारी, ,मुख्य लेखा परिक्षक,सांख्यिकी व संगणक प्रमुख, नगरसचिव, उद्यान अधिक्षक,मुख्य लेखा परिक्षक यांना एस 23 मेट्रिक्स नुसार वेतन दिले जाईल.
(6) तसेच मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनाही पालिकेने एस 29 पे मेट्रिक्स द्यावे असा प्रस्ताव होता मात्र, शासनाने त्यास नकार देत त्यांचे वेतनही एस 25 पे मेट्रिक्स द्यावे असे स्पष्ट केले आहे.