मुंबई – आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटला आहे.
राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने बांधकाम थांबवण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. भारत सरकारच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचं मोठं नुकसान झालं आहे. असं पत्रात म्हटलं आहे.
मात्र याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना केंद्रानं कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर दावा सांगितला असताना राज्य सरकारनंदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही, अशी माहिती दिली आहे.