मुंबई : महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्य रसातळाला गेले असून आणखी एक उद्योग गुजरातकडे गेला. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. आधी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प हे सगळे गुजरातच्या झोळीत पडले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महायुतीतील नेत्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधाने केली. यानिमित्ताने काँग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी गुरुवारी आंदोलने केली. दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज महायुती सरकारवर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले, हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जीभेला चटके द्या, पक्ष फोडा-आमदार पळवा, सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. दुसरीकडे अधिकारी हे मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. तसेच मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत असून राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असा आरोप त्यांनी महायुती सरकारवर केला आहे.
माहिती घेऊन बोलावे – उदय सामंत
नागपूरसह पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक उद्योग आणण्यात सरकार यशस्वी झाले आहे. नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार आहे, अशी माहिती कुठल्या सूत्रांनी त्यांना दिली. त्याबद्दल उद्योगमंत्री म्हणून कुठेही नोंद नाही. मात्र विदर्भात किती उद्योग आले याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती घेऊन बोलावे, असे प्रत्युत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उदय सामंत म्हणाले, विदर्भातील कुठलाही उद्योग अन्य राज्यात जाण्याचा प्रश्नच नाही. गुजरातला कुठला प्रकल्प जाणार याबाबत प्रधान सचिव यांच्याकडून माहिती घेण्यासाठी सूचना दिल्या आहे. विदर्भात किती उद्योग आले याबद्दल कदाचित विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचे लक्ष नसावे, अशी टीका त्यांनी केली.